कांगारूच्या देशात : काठावर पास

-अमित डोंगरे

एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतरही अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आपल्या चुका सुधारत विजय मिळवलेल्या भारतीय संघाने टी-20 सामन्यांच्या मालिकेत मात्र विजयी सलामी दिली. खरेतर या विजयात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बेजबाबदार फलंदाजी केल्यामुळेच त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. या सामन्यात भारताची कामगिरी संमिश्र झाली. या विजयाने टीकेची धनी बनलेली भारतीय संघाची कामगिरी काठावर उत्तीर्ण झाली असेच म्हणावे लागेल. 

भारतीय संघाकडे केवळ कागदी वाघ आहेत का, असा प्रश्‍न या विजयानंतरही निर्माण होतो. सलामीवीर लोकेश राहुलने फटकावलेले अर्धशतक व तळात रवींद्र जडेजाने केलेली आक्रमक नाबाद 44 धावांची खेळी वगळता बाकी सगळा आनंदी आनंदच होता. दुसरा सलामीवीर शिखर धवन 1, कर्णधार विराट कोहली 9, मनीष पांडे 2, संजू सॅमसन 23, हार्दिक पंड्या 16 ही आपली दर्जेदार फलंदाजी. कोहलीला रनमशिन म्हणतात, पण तो तर सातत्याने चाचपडताना दिसत आहे.

राहुल व जडेजा खेळले नसते तर आपण शंभरीही गाठू शकलो नसतो. एक गोष्ट समजत नाही की, हेच खेळाडू आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावा करत होते मग त्यांना ऑस्ट्रेलियात काय झाले. आपले फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहता त्यांना मायदेशी पाठवून स्थानिक क्रिकेट खेळायला लावले पाहिजे. 3 बाद 86 वरून एकदम 6 बाद 114 अशी गत झाली ती अत्यंत बेजबाबदार फलंदाजीमुळेच हे कोणीही नाकारणार नाही.

राहुलने सॅमसनच्या साथीत 38 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा धावांत संपूर्ण चित्रच बदलले. भारताचे सो-कॉल्ड भरात असलेले फलंदाज नांगी टाकताना दिसले. हे फलंदाज आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेत की, गल्ली क्रिकेट असाच प्रश्‍न निर्माण झाला.

एकीकडे निवड समितीवर टीका होते की, ते नवोदित गुणवत्तेला संधी मिळत नाही, पण मग जेव्हा संधी मिळते तेव्हा या खेळाडूंना काय होते हा देखील अभ्यासाचा विषय आहे. मनीष पांडे व संजू सॅमसनला सातत्याने संधी दिली जात आहे, पण त्यांच्याकडून संघासाठी लाभदायक खेळी आजवर झालेली पाहण्यात आली नाही. भारतीय संघात सगळेच सचिन, धोनी किंवा युवराजचे वारसदार मिळणार नाहीत हे खरे, पण मग निदान राहुल व जडेजासारखी खेळी करत उपयुक्त फलंदाज मिळायला काय हरकत आहे. आयपीएल स्पर्धेने दिलेला सेकंड बेंच कुठे आहे.

शुभमन गील, श्रेयस अय्यर यांना या सामन्यात का वगळले. इतकेच नव्हे तर यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहला का विश्रांती देण्यात आली, असे काही प्रश्‍न निर्माण होतात. टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली असली तरीही आता दुसरा सामना जास्त महत्त्वाचा आहे. यजमान संघाला एकही संधी न देता ही मालिका याच सामन्याद्वारे जिंकली तरच आगामी कसोटी मालिकेसाठी मानसिकता सकारात्मक बनेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.