पिंपरी, दि. 24 – शिक्षण विभागाच्या आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेने भोसरीत आयोजित केलेल्या परिसंवादाला तब्बल 250 शिक्षकांची अनुपस्थिती होती. या दांडीबहाद्दर शिक्षकांवर शिक्षण महापालिकेकडून प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसंवाद कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक आणि माध्यमिकच्या सर्व शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशाखाली कार्यशाळा घेण्यात आली. त्याला महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या सर्व शिक्षकांनी उपस्थित राहणे बंधनकारक होते. त्यावर सुमारे 1100 शिक्षकांनी उपस्थिती लावली. कार्यशाळेत शिक्षण विभागातील विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. त्यामध्ये विविध सामाजिक संघटनांच्या बरोबर भागीदारी, सीएसआर कमिटी, क्लार्क भरती, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, एम. डी. एम., मुख्याध्यापक कार्यशाळा, इंग्रजी भाषा शिक्षण, इंग्रजी विषय शिक्षकांची कार्यशाळा आदी योजना व उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. त्या-त्या विषयाशी संबंधित असणा-या संस्थेच्या प्रमुखांनी ते राबवत असणा-या उपक्रमाबाबतची माहिती कार्यशाळेत दिली. गुरुवारी (दि. 23) दोन सत्रात कार्यशाळा पार पडली. मात्र, सुमारे 250 शिक्षकांनी या कार्यशाळेला दांडी मारली होती.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसंदर्भात घेतलेल्या कार्यशाळेला अनुपस्थित राहिल्यामुळे दांडीबहाद्दर शिक्षकांना शिक्षण आणि विद्यार्थी यांच्याबाबत किती आत्मियता आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी अशा बेजबाबदार दांडी बहाद्दर शिक्षकांवर नाराजी व्यक्त केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडून गैरहजर राहणा-या सुमारे 250 शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांना नोटिसा बजावून अनुपस्थितीची कारणे सादर करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.
महापालिकेच्या शाळेतील शिक्षण पध्दती आणि तत्सम शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यासाठी व आजपर्यंत शिक्षण विभागाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच भोसरीत कार्यशाळा घेण्यात आली. दरम्यान, सुमारे अडीचशे शिक्षक गैरहजर होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग