मुंबई – मुंबई झोनच्या पूर्व मुंबई जीएसटी आयुक्तालयाने 40.5 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचे प्रकरण उघडकीला आणले असून वझीर एक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजवर कारवाई केली आहे. जीएसटी कर, व्याज आणि दंडाची रक्कम म्हणून आयुक्तालयाने 49.20 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वसूल केले आहेत.
वझीर एक्स हे विनिमय केंद्र झानमाई लॅब्जकडून चालवले जाते तर डब्लूआरएक्स हे क्रिप्टोकरन्सी चलन बिनान्स इन्वेस्टमेंट कंपनी या सेशेल्समधील कंपनीच्या मालकीचे आहे.
ट्रेडींग शुल्क, डिपॉझिट शुल्क आणि विथड्रावल शुल्क म्हणून ही कंपनी कमिशनमधून महसूल जमा करत होती असे चौकशीत आढळले. ही कंपनी रुपयावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत होती मात्र डब्लूआरएक्स चलनावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत नसल्याचे दिसून आले.
या व्यवहारावरील शुल्क म्हणून 18 टक्के दराने जीएसटी लागू होतो. अशा प्रकारे सुमारे 40.5 कोटी रुपयांचा जीएसटी भरला गेला नव्हता. हा कर आणि व्याज आणि दंडासह एकूण 49.2 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वझीरएक्सकडून जागीच वसूल करण्यात आले.
मुंबई झोनच्या सीजीएसटी विभागाचे अधिकारी ई कॉमर्स, ऑनलाईन गेमिंग, नॉन फंजीबल टोकन आणि इतर उदयोन्मुख क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व्यवहारांचा तपास त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य करचुकवेगिरीची शक्यता लक्षात घेऊन अधिक काळजीपूर्वक करत आहेत. मुंबई झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व क्रिप्टोकरन्सी विनिमय केंद्रांची तपासणी सीजीएसटी विभाग करणार असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.