कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मालखेड (ता. कराड) येथे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल महामार्ग पोलीस विभागाचे पुणे येथील अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या शासकीय वाहनावर कराड येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपये दंड केला. ही कारवाई करणारे हवालदार मधुकर पवार यांचा मोहिते यांनी सत्कार केला आहे. महामार्गावर वेगमर्यादा तपासणाऱ्या इंटरसेप्टर व्हेइकल स्पीडगनमधून तपासणी केल्यानंतर ही दंडात्मक कारवाई झाली आहे.
याबद्दल माहिती अशी, कराड महामार्ग पोलीस केंद्राच्या सपोनि अस्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी मालखेड फाटा हद्दीत महामार्गावर इंटरसेप्टर व्हेइकलमधील स्पीडगनच्या साह्याने वाहनांची वेग मर्यादा तपासत होते. महामार्ग पोलीस दलाच्या पुणे विभागाचे अधीक्षक मिलिंद मोहिते हे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शासकीय वाहनातून (एमएच-12-आरआर-0745) उजाळाईवाडी (जि. कोल्हापूर) येथे महामार्ग पोलीस केंद्राच्या वार्षिक तपासणीसाठी निघाले होते.
त्यांच्या गाडीच्या चालकाने मालखेड हद्दीत कमाल वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे स्पीडगनमधून दिसल्याने हवालदार मधुकर पवार यांनी त्या गाडीवर दंडात्मक कारवाई केली. कोल्हापूर येथील तपासणी आटोपून मिलिंद मोहिते काल (दि. 4) पुण्याला परत निघाले होते. त्यावेळी ते कराड येथील महामार्ग पोलीस केंद्रात थांबले असता, त्यांच्या कारने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचा प्रकार तेथील पोलिसांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मोहिते यांनी आपल्या गाडीच्या चालकास दंडाचे एक हजार रुपये भरायला सांगितले. या कारवाईबद्दल त्यांनी हवालदार पवार यांचे कौतुक करून 500 रुपयांचे बक्षीस दिले. गाडीच्या चालकाने एक हजार रुपये दंड भरल्यानंतर मोहिते पुण्याकडे रवाना झाले.