पुणे (गणेश आंग्रे )- शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडांची नोंद सातबारा उताऱ्यावर होत असल्याने त्यांची गणना होत नव्हती. झाडांचे नावे फक्त कागदावरच राहात होती. आता मात्र राज्य शासनाने बांधावरील झाडांची नोंद ई-पीक या मोबाइल ऍपद्वारे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे 91 प्रकारच्या झाडांची नोंदीची माहिती एका क्लिकवर गावनिहाय, तालुकानिहाय आणि जिल्हानिहाय मिळणार आहे.
राज्यात कोणत्या प्रकारचे झाडे सर्वाधिक आहे. शेतकरी कोणती झाडे लावण्यास प्राधान्य देतात. याची माहिती राज्य शासनाकडे जमा होणार आहे. यासुविधेमुळे राज्यातील वृक्षसंपदेची अचुक माहिती पहिल्यांदाच उपलब्ध होणार आहे.
गाव नमुना नं.7 हा “अधिकार अभिलेख’ विषयक असून गाव नमुना नं 12 हा “पिकांची नोंदवही’ ठेवण्यासंदर्भात आहे. गाव नमुना नंबर 12 मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असतात. पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी हे पीक पेरणी अहवालाच्या नोंदी नमूद करतात. मात्र, अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदी अद्ययावत होत नाहीत.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिकांची नोंद आता मोबाइल ऍपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ऍपमध्ये पिकांबरोबरच बांधावर असलेली झाडे नोंदविण्याची सुविधा आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून झाडांची नोंद सातबाऱ्यावर करण्यात येत नव्हती. त्यामुळे तलाठी यांना जो शेतकरी माहिती देईल, त्यांच्याच शेतातील झाडांची नोंद सातबारा उताऱ्यावर होत होती. त्यामुळे झाडांची अचुक माहिती उपलब्ध होत नव्हती.
तसेच कोणत्याच ठिकाणी याची एकत्रित आकडेवारी उपलब्ध नाही. आता या सुविधेमुळे या सर्व झाडांची संख्या एका क्लिकवर मिळणार आहे. एका सर्व्हेनंबरमध्ये किती झाडे आहेत, याची माहिती अक्षांश व रेखांशासह उपलब्ध होणार आहे. ही माहिती पर्यावरण, वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि कृषी या विभागांनासुद्धा उपयोगी पडणार आहे.
ई-पीक मोबाइल ऍपद्वारे जिरायत, बागायत पीके, फळबागांसह बांधावरील झाडे, जलसिंचनाची साधने, शेततळे, शेडनेट आदींच्या अचुक नोंदी करता येतात. बांधावरील झाडे यामध्ये 91 प्रकारच्या झाडांची नोंद घेताना त्यांची संख्यासुद्धा नमुद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे झाडांची आकडेवारी मिळणार आहे. पहिल्यांदाच या ऍपद्वारे अशाप्रकारे वृक्षसंपदेची माहिती मिळणार आहे. – रामदास जगताप, प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी, ई-फेरफार योजना
या झाडांची नोंद करता येणार
रबर, मोह, महु, महोगनी, साग, हिरडा, बेहडा, निलगिरी, लाख, बाभुळ, शिसव, खैर, बिवळा, बिजा, तेंदु, अर्जुन, चंदन, देवदार, अशोक, ओक, ऐन, उंबर, वड, पिंपळ, टेंभुर्णी, खिरणी, बॉटल ट्री, सिल्वर ओक, ताड, आपटा, तिवसा, किंजळ, किंडळ, अंजन, शिवम, नाना, कझरा,भेडस, सुबाभुळ, पिंपरणी, गुलमोहर, सुपारी, करंज, कडुलिंब, बिब्बा, सागरगोटा , धावडा, पळस, बेल, हिंगणी, रेनट्री,भोकर, पणेरी, खारफुटी, नरक्या, अमृता, रक्तचंदन, पाषानबेद, चिमणसाग, हळद, पांढरा ऐन, सिताफळ, आवळा, चाफा, सिंधी झाडे, हेला, बकुळ, चिकु, बदाम, रामफळ, काजु, चिंच, खजुर, फणस, जांभुळ, कवठ, आंबा, बोर, नारळ, कदंब, कोकम, मलबार नीम, लिंबु, संत्री, किन्ही, कसई, रोवन, हिवर, मुंडल, शिवन.