पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत 31 नवीन महाविद्यालयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ते अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. फक्त नवीन महाविद्यालयाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी ही बैठक बोलाविली होती. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन महाविद्यालयाच्या प्रस्तावावर चर्चा झाली.
नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी एकूण 39 प्रस्ताव शिक्षण संस्थांनी विद्यापीठाकडे सादर केले होते. त्या सर्व प्रस्तावाची छाननी केल्यानंतर हा विषय बैठकीत मांडण्यात आला. त्यात 31 नवीन महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रस्ताव मंजूर केला. उर्वरित प्रस्ताव 15 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार निकष पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांचा विचार केला नाही. विशेष म्हणजे यात 29 महाविद्यालये पुण्यातील आहे. उर्वरित नगर, नाशिकमधील आहे.