वॉशिंग्टन – दोन वर्षांच्या मुलाने चुकून केलेल्या गोळीबारात त्याच्याच गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतल्या ओहियो प्रांतात 16 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली. लॉरा इल्ग यांनी 911 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. आपल्या 2 वर्षांच्या मुलाने चुकून गोळी झाडली असून ही गोळी आपल्या पाठीत घुसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलीस त्वरित घटनास्थळी पोचले आणि त्यांनी लॉरा यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र लॉरा आणि त्यांच्या बाळाचा जीव वाचू शकला नाही, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना घडली तेंव्हा लॉरा 31 आठवडयांची गर्भवती होत्या.
लॉरा घरकाम करत असताना त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे बेडरुममध्ये खेळत होता. त्यावेळी त्याने लॉरा यांच्या पतीच्या पिस्तुलाशी खेळायला सुरुवात केली. त्यावेळी लॉरा जवळच होत्या. पण त्यांचे आपल्या मुलाकडे लक्ष नव्हते. खेळताना मुलाने चुकून गोळी झाडली आणि ती लॉरा यांच्या पाठीत घुसली. लॉरा यांनी स्वतः पोलिसांना ही माहिती दिली मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.