बस गेली शेतात; प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली
कराड – सुपने ते आबईचीवाडी दरम्यान कराड-बेलदरे या एसटी बसचालकाला बस चालवतानाच हृदयविकाराचा धक्का बसल्याने अपघात झाला. त्यामध्ये चालती एसटी रस्ता सोडून नाल्यातून उसाच्या शेतात गेली. एसटी बसचा वेग कमी असल्याने व त्यात प्रवाशी नसल्याने जीवीत हानी घडली नाही. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. ए. एस. नाडगौडा असे त्या चालकाचे नाव असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कराड एसटी आगाराची कराड-बेलदरे ही एसटी बस घेवून बसचालक नाडगौडा हे आज पहाटे सहाच्या सुमारास बेलदरे येथे निघाले होते. ते बस चालवत सुपने ते आबईचीवाडी दरम्यान, एसटी चालवत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालती बस रस्ता सोडून नाल्यातून ऊसाच्या शेतात जावून आदळली.
अचानक ही घटना घडल्याने वाहकाला चालकाच्या हालचालीवरुन त्यांना ऍटॅक आल्याचे लक्षात आले. वाहक सुहास पवार यांनी तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने चालक नाडगौडा यांना कृष्णा रुगणालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने एसटी बसमध्ये प्रवाशी नसल्याने आणि एसटी बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.