नवी दिल्ली – भाजप हा गुंडांचा आणि अशिक्षितांचा पक्ष आहे. त्या पक्षावर जनतेने बहिष्कार घालावा, असे आवाहन आम आदमी पक्षाने (आप) शनिवारी जनतेला उद्देशून केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यावेळी केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या आवारात तोडफोड करण्यात आली. त्याप्रकरणी भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. जामिनावर सुटका झालेल्या त्या कार्यकर्त्यांचा दिल्ली भाजपकडून सत्कार करण्यात आला.
त्यामुळे संतप्त बनलेल्या आपने भाजपवर टीकेची झोड उठवली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, खासदार राघव चढ्ढा आणि सौरभ भारद्वाज या आपच्या नेत्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. नंतर केजरीवाल यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला.
अमेरिकेत कुणी गुंडगिरी केल्यास तो तुरूंगात जातो. मात्र, भारतात तशी व्यक्ती भाजपमध्ये जाते. युरोपात मुलीची छेडछाड करणाऱ्यास तुरूंगात जावे लागते. मात्र, तशी व्यक्ती भारतात त्या पक्षात जाते. भाजप कधीच चांगल्या शाळा उभारणार नाही. कारण त्या पक्षाला राजकारण पुढे नेण्यासाठी अशिक्षित, बेरोजगार आणि गुंड हवे आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले.