चंदीगड – पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मंगळवारी आणखी 15 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाने जाहीर केलेली ही पाचवी यादी असून यासोबत आता आपने जाहीर केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 88 झाली आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत ज्यासाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. आप उमेदवारांच्या ताज्या यादीनुसार, कुलवंत सिंह मोहालीतून निवडणूक लढवणार आहेत. कुलवंत सिंग हे रिअल इस्टेट व्यावसायिक असून ते मोहालीचे माजी महापौर राहिले आहेत. त्यांनी सोमवारी ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे.
तसेच गुरदीप सिंग रंधावा डेरा बाबा नानकमधून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. याशिवाय राजा सांसीमधून बलदेव सिंग, कपूरथलामधून मंजू राणा, शाहकोटमधून रतन सिंग, जालंधर पश्चिममधून शीतल अंगुराल, आदमपूरमधून जीत लाल भाटी आणि बांगामधून कुलजीत सिंग आप कडून नशीब आजमावणार आहेत.
चमकौर साहिबमधून चरणजीत सिंग, बस्सी पठाणातून रुपिंदर सिंग, लुधियाना दक्षिणमधून राजिंदर कौर, फिरोजपूर शहरातून रणवीर सिंग, भटिंडा अर्बनमधून जगरूप सिंग, अमरगढमधून जसवंत सिंग आणि नाभामधून गुरदेव सिंग निवडणुक लढणार आहेत.