पुणे – इयत्ता पहिली ते बारावीच्या 90.57 टक्के विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अपडेशनचे काम पूर्ण झाले आहे. अद्यापही राज्यातील 19 लाख 99 हजार 990 विद्यार्थ्यांचा डेटा जुळत नसल्याने त्याचे कोडे सुटलेले नाही. तर, या विद्यार्थ्यांच्या आधार अपडेशनचे कामकाज अपूर्णच राहिले आहे. एकाही जिल्ह्यात 100 टक्के काम पूर्ण झाले नसल्याची बाबही निदर्शनास आलेली आहे. यामुळे विद्यार्थी योजना आणि शिक्षक भरतीचे गणित बिघडले आहे.
पुणे जिल्हा देखील पिछाडीवर
शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अपडेशनसाठी अनेकदा मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र तरीही काहीना काही कारणास्तव शाळांकडून काम प्रलंबितच पडलेले आहे. पुणे जिल्ह्यात 86.14 टक्के विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अपडेशनचे कामकाज पूर्ण झाले आहे. अजूनही 13.86 टक्के काम अपूर्ण आहे.
आकडे सांगतात…
2 कोटी 12 लाख 11 हजार 434 – एकूण विद्यार्थी
2 कोटी 8 लाख 88 हजार 425 – विद्यार्थ्यांची पोर्टलमध्ये नोंद
2 कोटी 1 लाख 50 हजार 601 – विद्यार्थ्यांचा आधार डेटा “यूआयडीएआय’कडे पडताळणीसाठी पाठवला
1 कोटी 92 लाख 11 हजार 444 – जणांची डेटा पडताळणी वैध
9 लाख 39 हजार 157 – विद्यार्थ्यांचा डेटा अवैध
7 लाख 33 हजार 824 – विद्यार्थ्यांच्या डेटावर प्रक्रियाच नाही
3 लाख 23 हजार 9 – विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या माहितीची शाळांमध्ये नोंदच नाही.