सातारा – पुणे- बंगळूरू महामार्गावर साताऱ्यानजिक गौरीशंकर कॉलेज ते रायगाव फाटा यादरम्यान आयशर टेंपोचा टायर फुटून उभ्या असणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.
अपघातातील मृत व जखमी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शिरवळ येथे वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात होऊून एका वारकऱ्याचा मृत्यू झाला होता. गेल्या चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. कडेगाव तालुक्यातील वारकऱ्यांना आळंदी येथे घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी पहाटे रायगाव फाट्यानजिक थांबला होता. यादरम्यान पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोचा टायर फुटून तो उभ्या ट्रकला पाठीमागून धडकला.
या अपघातात एका वृध्द वारकऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वारकरी सांगली जिल्ह्यातील असून सांगलीहून आळंदीला जाताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.