सांगली -जत तालुक्यातील अनंतपूर- शिंगणापूर रस्त्यावरील चेकपोस्टवर नाकाबंदीसाठी पोलिसांसोबत ड्युटीवर असलेल्या नानासाहेब सदाशिव कोरे- माळी (वय 36) या शिक्षकाला ट्रकने चिरडले. मंगळवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. यावेळी त्या ठिकाणी असलेला संजय बसगोंडा चौगुले मात्र थोडक्यात बचावला.
याप्रकरणी ट्रकचालक हणमंत रामचंद्र मुरड (रा. नाथाचीवाडी ता. दौंड जि. पुणे) यास जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यातील अंकले येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्याने अंकले व डफळापूर परिसरात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. डफळापूर, शिंगणापूर, अनंतपूर या ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. या चेकपोस्टवर एक पोलिस, एक शिक्षक आणि एक डाटा ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यामार्फत तालुक्यात येणाऱ्या वाहनांची
तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातील अथणी येथून सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक (एम एच 12 एल डी 9749) डफळापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी चेक पोस्टवर तैनात असलेल्या पथकाने या ट्रकला थांबण्याचा इशारा केला. परंतु, ट्रक न थांबता भरधाव वेगाने पुढे निघून गेला.
यामुळे शिक्षक नानासाहेब कोरे व डाटा आपरेटर संजय चौगुले यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. यावेळी डफळापूर स्टॅंडजवळ भरधाव निघालेला ट्रक अडविण्याच्या प्रयत्नात असताना ट्रक कोरे यांच्या डोक्यावरुन गेला. रक्तस्त्राव झाल्याने कोरे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थाळी धाव घेवून ट्रक चालक हणमंत मुरड यास ताब्यात घेतले. ही घटना समजताच अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक राजाराम शेळके घटनास्थळी दाखल झाले. अपघाताबाबत जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.