कर्मचारी विरोधी धोरणामुळे सरकारच्या विरोधात संतापाची लाट
पॅरीस : फ्रांस सरकारने निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनाही बंद करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे त्या निर्णयाच्या विरोधात सरकारी सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे.
गेले तेरा दिवस हा संप सुरू आहे. त्यामुळे फ्रांसमधील अनेक सेवा खंडीत झाल्या आहेत. आयफेल टॉवरवरील कर्मचारीही या संपात सहभागी झाल्याने पर्यटकांची मात्र मोठ्या प्रमाणात निराशा होत आहे. फ्रांसमधील रेल्वे कर्मचारीही या संपात सहभागी झाले असून त्यामुळे देशभरातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरीकांनाही मोठी अडचण सहन करावी लागत आहे.
रेल्वे सेवा बंद असल्याने रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण अचानक वाढले असून त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम सारखे प्रकार घडत आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी क्षेत्रातील कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने संपाची तीव्रता वाढली आहे. सरकारने निवृत्तीचे वय 64 पर्यंत वाढवले आहे.
या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या 50 व्या वर्षीही निवृत्त होता येत होते व त्या वयापासून त्यांना पेन्शन मिळू शकत होती. पण सरकारने 64 वर्षाच्या वयानंतरच पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारी कर्मचारी संतापले आहेत.