नवी दिल्ली -भारताच्या नव्या संसद भवनासमोर आता येत्या 28 मे पासून आंदोलन सुरु करणार आहोत, अशा इशारा भारतीय कुस्तीपटूंनी दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या महिला कुस्तीगिरांनी 21 मे हा दिवस अल्टिमेटम दिला होता व त्यापूर्वी ब्रिजभूषण यांना अटक न झाल्यास आंदोलनीा नवी दिशा ठरवणार असेही सांगितले होते.
याच 28 मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार असून, कुस्तीपटूंशी संवाद साधल्यावर खाप महापंचायतने आंदोलनासाठी हाच दिवस व हेच ठिकाण निश्चित केले आहे. रविवारी सायंकाळी कुस्तीपटूंची बैठक पार पडली व त्यात हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक समितीने नियुक्ती केलेली हंगामी समिती 20 जून रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचणी घेणार आहे. आता यासाठी कुस्तीगिरांकडे सरावासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे आंदोलनातील सहभागी कुस्तीगिरांची भूमिका काय राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. ब्रिजभूषण यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. सचिव विनोद तोमर यांचीही चौकशी झाली आहे. महासंघाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तक्रार दाखल केलेल्या अल्पवयीन कुस्तीगिरासह बहुतेक महिलांचे जबाबही न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवून घेण्यात आले आहेत.
नार्को चाचणीची तयारी – ब्रिजभूषण
आंदोलक कुस्तीगिरांच्या मागणीनुसार आपली नार्को चाचणी करण्याची तयारी असल्याचे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे. मात्र, माझ्यासोबत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचीही चाचणी झाली पाहिजे. त्यांची तयारी असल्यास मी देखिल चाचणीसाठी तयार आहे, असे ब्रिजभूषण यांनी सांगितले आहे.