आळंदी – तीर्थ भागीरथी अहर्निशीं । तुज नित्य स्नानासि दिधलीसे ॥ संत नामदेव महाराज यांच्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी प्रसंगाच्या अभंगामध्ये भागीरथी तीर्थाचा उल्लेख पाहायला मिळतो. त्यामुळे आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी आलेले भाविक भागीरथी तीर्थ कुंड कुठे आहे? हे पाहण्यासाठी त्याचा शोध घेत असतात.
भागीरथी कुंड हे माऊलींच्या मंदिराच्या महाद्वारापासून जुन्या जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या समोरून पुढे प्रदक्षिणा रोडकडे जाताना डाव्या बाजूला आहे. मात्र सध्या हे कुंड भाविकांना सहज पाहता येत नाही. कुंडाचे पावित्र्य जपण्यासाठी लगतचा परिसर बंदीस्त करण्यात आला आहे. काही भाविक हे संरक्षक भिंतीवर चढून कुंड पाहण्याचा प्रयत्न करतात मात्र ते धोक्याचे आहे. भागीरथी कुंडासह आळंदी परिसरात इतर विविध कुंड असल्याचे सांगितले जाते.
2018 मध्ये कुंडातून काढला 12 टन गाळ –
आळंदी नगरपालिका हद्दीत गावठाणातील भागीरथी कुंड गेल्या 25 वर्षांपासून दुरावस्थेत होते. स्थानिक धर्मशाळा, हॉटेल व्यावसायिकांनी शिल्लक अन्न, कचरा टाकल्याने भागीरथी कुंड पूर्णपणे नामशेष झाले होते. कुंडाच्या कडेच्या दगडी भिंतीही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. दरम्यान 2018 मध्ये प्रशासन, विविध सेवाभावीसंस्था यांच्यावतीने कुंडातील 12 टन गाळ काढण्यात आला. विविध सेवाभावी संस्था कुंडाच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करत आहेत.
दुष्काळात भागवली तहान –
आळंदीत उन्हाळ्यात 1987 ते 1994 पर्यंत इंद्रायणी कोरडी पडली की पाणीटंचाईची स्थिती निर्माण व्हायची. मात्र, प्रदक्षिणा रस्त्यावरील फ्रूटवाला धर्मशाळेची विहीर आणि भागीरथी कुंडांतील पाण्याचा आधार नागरिकांना होत असे. त्याकाळी याच कुंडातील पाण्याने दुष्काळात आळंदीकरांची तहान भागवली. परिसरातील नागरिक आणि वारकरी विद्यार्थी या कुंडातील पाण्याचा वापर 1994 पर्यंत करत होते. 2018 मध्ये पुन्हा यातील गाळ काढून पूर्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2022मध्येही प्रयत्न करण्यात आले. मात्र सध्यस्थितीत या कुंडाजवळून गेले तरीही भाविकांना हे पवित्र ऐतिहासिक भागीरथी कुंड आहे याची माहिती मिळत नाही. कुंडाच्या भोवती कुंडाचा नामोल्लेख असलेले कोणतेही फलक लावण्यात आलेले नाही. हे तीर्थकुंड पाहायला मिळावे, अशी भाविक इच्छा व्यक्त करत असतात.
तीर्थक्षेत्र आळंदीतील सद्यस्थितीतील ऐतिहासिक पवित्र भागिरथी कुंड.. pic.twitter.com/aDM6Y37fFN
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 22, 2023