रमेश पवार
कर्जत – प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांला आ. रोहित पवार हे कात्रजचा घाट दाखवतात. युवा कार्यकर्त्यांना संधी या नावाखाली उपद्रवी पिलावळ जमा करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून त्रास दिला जातो.
त्यांच्या या कार्यपद्धतीला कंटाळून मी पक्ष सोडत आहे, अशा शब्दांत टीका करत सिद्धटेकचे उपसरपंच रमेश पवार यांनी आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे मागील महिन्यात सिद्धटेक ग्रा. पं. मध्ये भाजप आणि त्यांनी एकत्र येत सत्ता परिवर्तन घडवून आणले होते परंतु या सर्व घडामोडीत पक्ष मात्र सोडला नव्हता. आज त्यांनी आ.रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर कडाडून टीका करत राष्ट्रवादी (शरद पवार गट ) पक्षाला रामराम ठोकला.
यावेळी तळवडी ताजु या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे सरपंच शीतल एकनाथ तुरकुंडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दरम्यान, भाजपच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून प्रामाणिक काम करा, असा कानमंत्र आ. राम शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्याना दिला. यावेळी एकनाथ तुरकुंडे, ग्रा.पं.सदस्य ज्ञानदेव दराडे, निखिल बनसुडे, नानासाहेब पांडुळे, काशिनाथ साबळे, रघुनाथ तुरकुंडे, बाबाजी गोयकर, अल्ताफ शेख, धनराज तुरकुंडे , संपत साबळे उपस्थित होते.
यावेळी बाजार समितीचे संचालक मंगेश जगताप व वाल्मिक साबळे यांचे योगदानही महत्वाचे आहे, अशी भावना सर्व सदस्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे , तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, सुनील यादव, प्रवीण घुले , अशोक खेडकर, मंगेश जगताप, वाल्मिक साबळे, पोपट मोरे, भाऊसाहेब सुपेकर, अनिल गदादे, काका धांडे उपस्थित होते.