कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील सहकारी संस्था अबाधित ठेवण्यासाठी काळे, कोल्हे, परजणे यांनी अंतर्गत राजकारणाला फाटा देवून तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये निवडणूक न होवू देता एकमेकांच्या सहकार्याने बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेसह कॉंग्रेस व इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र वज्रमूठ बांधून हि निवडणूक बिनविरोध न करता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
अखेर काळे, कोल्हे या महाशक्तीसमोर निवडणुकीचा शड्डू ठोकल्याने या निवडणुकीत परिवर्तन होईल की काय, अशी शंका काहींना होती. परंतु मतदारांनी काळे, कोल्हे व परजणे यांच्या सहमतीला सहमत होवून 3 जागा बिनविरोध तर 15 जागा एकहाती निवडून देत विरोधकांचा सफाया केला. काही मतदारांनी काळे, कोल्हे, परजणे यांच्या सोबत राहुनही विरोधी गटाच्या उमेदवारांना मतदान केले तर काही कोणालाही नाराज न करता सर्वांना मतदान करुन आपले बाद केले तसेच काहींनी जाणुनबुजून आपले मत बाद करीत करुन आपला रोष व्यक्त केल्याचे मतपत्रिकेवरून दिसले.
दरम्यान, बाजार समितीच्या 18 संचालक मंडळाची निवडणुकीत यापूर्वीच 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीजमाती मतदारसंघातून रावसाहेब रंगनाथ मोकळ, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून रामदास भिकाजी केकाण तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून अशोक सोपान नवले यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली होती. सर्वसाधारण (वि. का. सोसायटी) मतदार संघाच्या 7 जागेसाठी 16 उमेदवार, महिला राखीव 2 जागांसाठी 4, इतर मागासवर्ग 1 जागेसाठी 3, सर्वसाधारण (ग्रामपंचायत) 2 जागांसाठी 4, व्यापारी आडते मतदारसंघातून 2 जागांसाठी 8 तर हमाल मापाडी मतदारसंघच्या 1 जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात उतरले होते.
सर्वसाधारण विकास कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे बाळासाहेब गंगाधर गोर्डे (940), शिवाजी बापूराव देवकर (967), गोवर्धन बाबासाहेब परजणे (1098), साहेबराव किसन रोहम (1112), साहेबराव शिवराम लामखडे (1103), लक्ष्मण विश्वनाथ शिंदे (1105), संजय माधवराव शिंदे (1083). या मतदारसंघात 71 मते बाद झाली.
महिला राखीव मतदार संघ- मिना सर्जेराव कदम (1147), माधुरी विजय डांगे (1131). इतर मागासप्रवर्ग- खंडू गुंजाळ फेपाळे (1110). सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदारसंघ- प्रकाश नामदेव गोर्डे (631), राजेंद्र शंकर निकोले (608). व्यापारी आडते मतदारसंघ- रेवनाथ श्रीरंग निकम (69), ऋषिकेश मोहन सांगळे (106).
हमाल मापाडी मतदारसंघ- रामचंद्र नामदेव साळुंके (47). विजयी उमेदवारांची माहितीनिवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली. निवडणूक प्रक्रिय पूर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ, सहायक निवडणूक अधिकारी संदीप नेरे, क्षेत्रीय अधिकारी दीपक वाकचौरे, राजेंद्र रहाणे, वाकचौरे, सचिव नानासाहेब रणशूर, प्रशांत कोपरे, संतोष मुरडणे यांच्यासह पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.