तिरुवनंतपुरम (केरळ) – करोनाची तिसरी लाट देशभरात ओसरत असतानाच केरळमध्ये मंकी फिव्हरची लागण झालेला एक रुग्ण सापडला आहे. केरळमधील वायनाडमध्ये हा रुग्ण सापडला आहे. या रोगाला “कायसानूर फॉरेस्ट डिसीज’ म्हणून संबोधले जाते, असे राष्ट्रीय साथरोग नियंत्रण कार्यक्रमाचे सल्लागार डॉ. नरेश पुरोहित यांनी म्हटले आहे.
कालपेट्टा जवळच्या तिरुनेल्ली गावातील 24 वर्षे युवकाला या रोगाची लागण झाली असल्याचे तपासणीमध्ये उघड झाले आहे, असे डॉ. पुरोहित यांनी सांगितले. या रोगाची लक्षणे सर्वप्रथम पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कसानूर जंगलात आढळली होती. त्यामुळे त्याचे नामकरण या जंगलाच्या नावावरूनच करण्यात आले आहे.
लागण झालेल्या तरुणाला मानंतवाडी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, अजून एकही अन्य रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य अधिकाऱ्यांनी यापूर्वीच इशारा दिला आहे आणि स्थानिक लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मंकी फिव्हर हा रोग प्रमुख्याने माकडाच्या अंगावरील किटकामुळे तो पसरत असल्याचे मानले जाते. या वर्षात केरळमध्ये या रोगाचा हा पहिलाच रुग्ण सापडला आहे.