वाघोली – वाघोली गावचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच माणिकदादा सातव पाटील यांची निधन वार्ता क्लेशदायक व धक्कादायक असून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर अपार श्रद्धा असलेला नेता हरपल्याची भावना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील यांचे ते बंधू होते.
वाघोली गावाच्या विकासात नेहमी अग्रेसर असणारे व ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे करणारे सातव पाटील कुटुंब सर्वश्रुत आहे. याच कुटुंबातील ज्येष्ठ तथा वाघोली चे नेते माणिक दादा अमृतराव सातव पाटील यांचे दि. 25 रोजी पहाटे दुःखद निधन झाल्याने वाघोली गावावर शोककळा पसरली आहे.सामाजिक सेवेसाठी वाहून घेतलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याने वाघोली गावात दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केली आहे. वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांचे ते मोठे बंधू तर माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांचे दिर होते.