- 68 हजार 200 नागरिकांवर दंडात्मक कारवाई
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णवाढीचा दर लक्षात घेता सर्व यंत्रणा दक्ष करण्यात आल्या आहेत. तर करोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या 68 हजार 200 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दंडापोटी तीन कोटी 72 लाख, 11 हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. जिल्हा महिती कार्यालयाच्या वतीने याबाबतची माहिती दिली आहे.
केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडील आदर्श कार्यप्रणालीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सूत्र अंमलात आणण्यात येत आहे. महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यंत्रणा कोविड प्रतिबंधाकरिता फेरकार्यान्वित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, थेरगाव, मोशी, भोसरी, चिखली आणि काळेवाडी तर मावळ तालुक्यात तळेगाव नगरपालिका येथे करोना रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे.
करोनाच्या काळात अनेक नागरिकांकडून मास्क न लावणे, सार्वजनिक थुंकणे अशा प्रकारचे गैरवर्तन होत आहे. या नागरिकांच्या गैरवर्तणुकीमुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्यास हातभार लागत असल्याने, त्यांच्यावर दंडात्मक करवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.