बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या वादग्रस्त जीवनावर एक चित्रपट साकारणार आहे. या माजी अभिनेत्रीच्या जीवनावर आधारित बिलाल सिद्दीकी यांच्या “द स्टारडस्ट अफेअर’ या पुस्तकाचे हक्क निर्माता निखिल द्विवेदी यांनी घेतले आहेत.
“द स्टारडस्ट अफेयर’ हे पुस्तक ममता कुलकर्णी हिच्या अस्थिर आणि घटनात्मक जीवनावर आधारित आहे. बॉलीवूड स्टारपासून ते कथित अंडरवर्ल्ड लिंकपर्यंत “गॉडमदर’ होईपर्यंत ममता कुलकर्णी नेहमीच चर्चेत राहिली आहे. या चित्रपट करण्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर निखिल अधिकृत घोषणा करणार आहे. तथापि, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम लवकरच सुरू होईल असे समजते.
दरम्यान, नव्वदच्या दशकात आपल्या जोश आणि वेगळ्या स्टाईलसाठी परिचित असलेल्या ममताने “करण अर्जुन’, “बाजी’ आणि “चायना गेट’ यासारख्या हिट चित्रपटांत काम केले आहे.
ममता बॉलीवूडमधून गायब झाल्यानंतर ती केनियाच्या नैरोबी येथे स्थायिक झाली असून आध्यात्मिक जीवन जगत असल्याचा खुलासा तिने केला होता. तथापि, काही वर्षांपूर्वी एका ड्रग रॅकेटच्या आरोपात तिचे नाव समोर आले होते.