जुन्नर (प्रतिनिधी)– जुन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिनेश किसन दुबे (वय-५७) यांचे रविवारी (दि. १९) पहाटे पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना बळींची संख्या सात झाली, असून जुन्नर शहरातील हा दुसरा मृत्यू आहे.
एक आक्रमक नेता तसेच सर्वांसाठी संकटकाळात धावून जाणारा नेता अशी ओळख असलेले दिनेश दुबे हे भैया या नावाने सर्वांना परिचित होते. तीस पेक्षा अधिक काळ राजकारणात असलेल्या दुबे यांनी एकाही निवडणुकीत हार पत्करली नव्हती. आमदार अतुल बेनके यांचे जुन्नर शहरातील विश्वासू सहकारी अशी ओळख निर्माण झालेले दुबे हे पालिकेतील राष्ट्रवादीचे विद्यमान गटनेते होते.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक जिंकली होती. त्यांचे चुलते सुरेश दुबे हे पालिकेत नगरसेवक असताना त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. त्यानंतर तत्कालीन आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नगरपालिकेत १९९६ ला प्रवेश केला. १९९६ ते २००१ आणि २००१ ते २००६ ह्या दोन टर्ममध्ये त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणुन काम पाहिले.
त्यानंतर २००६, २०११ आणि २०१६ ह्या सलग तीन निवडणुकीत जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून पालिकेत पाठविले होते. ह्या कार्यकाळात त्यांनी नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षपद भूषवत जुन्नर शहरात अनेक विकासकामे राबविली. त्यांच्या निधनामुळे शहरातील विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.