कटनी (मध्य प्रदेश) – मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्याला धार्मिक नगरी बनवण्यासाठी मोठी योजना तयार करण्यात आली असून, त्यात भगवान परशुरामांची 108 फूट अष्टधातूची मूर्ती असेल. ही परशुरामांची जगातली सर्वात मोठी मूर्ती असेल. या मंदिराच्या परिसरातच अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृती यासह अनेक छोटी मंदिरे असतील.
विजयराघवगढ जिल्ह्यातील बंजारी गावाची धार्मिक नगरी तयार करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्याला प्रयाग असे नाव देण्यात आले आहे. तिथे महानदी आणि कटनी नदीचा संगम आहे, त्यालाच प्रयाग म्हणतात. भगवान परशुरामांचा 108 फुटांचा पुतळा उभारणार असून, हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा मानला जाणार असल्याची माहिती आमदार संजय पाठक यांनी दिली आहे.
या मंदिराच्या भूमिपूजनासाठी स्वामी भद्राचार्य, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहतील. पाठक म्हणाले की, विजयराघवगडची संपूर्ण देशात धार्मिक नगरी म्हणून ओळख व्हावी. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी नदीत क्रूझ, हेलिपॅडसह रिसॉर्टही बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर भगवान परशुरामांच्या पुतळ्यासाठी सर्वांकडून सहकार्यही मागण्यात आले आहे.