- बेकायदेशीर अवजड वाहतूक : एकूण 1 हजार 48 वाहनांची तपासणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सर्रासपणे मालवाहक वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली जाते. शहरातील एमआयडीसी भागासह महामार्गावर ओडीसी (ओव्हर डायर्मेशन कार्गो) वाहतूक सुरु असते. दरम्यान, शहरातंर्गत येणाऱ्या अशा मालवाहतूक वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कारवाई सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या 332 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 80 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.
कडक लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीवर निर्बंध आणले होते. त्यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथील करत माल वाहतूक सुरु केली. मात्र या काळात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक होत असल्याचे समोर आले.
त्याचबरोबर आरटीओने देखील आपले “वायुवेग’ पथकही रस्त्यावर उतरले होते. या पथकाने या काळात क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची तपासणी मोहीम सुरु केली होती. गेल्या महिन्यात या पथकाकडून 208 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात जवळपास 50 हून अधिक वाहने दोषी आढळून आली. तर, गेल्या सहा महिन्यांत जवळपास 1 हजार 48 वाहनांची तपासणी केली आहे. त्यातील 332 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 80 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
अवजड वाहने त्यांच्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेल्याने धोका निर्माण होतो. त्यावर नियंत्रण राहण्यासाठी आरटीओचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. शहरातील कंपन्या व महामार्गालगत हे पथक गस्त घालत असते. त्यानुसार अवजड वाहनांची तपासणी करुन अशा वाहनांवर ते थेट दंड ठोठावत आहेत. गेल्या सहा महिन्यात या पथकाकडून 332 वाहनांकडून 80 लाखांचा दंड वसूल केला आहे.
– अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.