बीजिंग – तैवानच्या खाडीतील युद्धनौकेच्या निमित्ताने अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा उफळला आहे. अमेरिकेची युद्धनौका तैवनच्या खाडीत असल्याचे निदर्शनास आणून चीनने या संदर्भात अमेरिकेला इशारा दिला आहे.
या युद्धनौकेच्या उपस्थितीवरून आपण आपल्या नाविक आणि हवाई दलांना सतर्क केले आहे, असे चीनने म्हटले आहे. चीनच्या नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रवक्ते मेजर. झांग चुनशुयान यांनी या संदर्भातील माहिती दिली.
‘युएसएस बेरी’ या आर्ले बुर्क श्रेणीच्या विनाशिकेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश चीनच्या हवाई आणि नाविक दलांना देण्यात आले आहे. अमेरिकेकडून अलिकडच्या काळात तैवानच्या स्वतंत्र्याचे समर्थन करण्याचे संकेत दिले जात आहेत.
अमेरिका पुरस्कृत स्वयंघोषित लोकशाही असलेले तैवानवर चीनचा दावा आहे. जर आवश्यकता भासल्यासा तैवानला चीनच्या भूमीशी बळाच्या जोराने जोडले जाऊ शकते, असे मेजर चुनशुयान यांनी सांगितले.
तैवानची खाडी ही सागरी मार्ग म्हणून सार्वजनिकरित्या खुली आहे. मात्र येथून अमेरिकेच्या सशस्त्र वाहतुकींवर चीनचा नेहमीच आक्षेप आहे. तैवान, दक्षिण चीन समुद्र, व्यापारी वाद आणि अन्य विषयांना चीनकडून नेहमीच जरा जास्त ठळकपणे अधोरेखित केले जात असते.
तैवानच्या खाडी परिसरातील शांतता आणि स्थैर्य अमेरिका धोक्यात आणत आहे. अमेरिकेने या भागातील तणाव वाढेल अशी कृती अथवा वक्तव्य करू नये, असेही मेजर चुनशुयन यांनी म्हटले आहे.
‘युएसएस बेरी’ ही युद्धनौका आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करून नेहमीच तैवानच्या खाडीतून प्रवास करते. या सागरी मार्गाचा वापर करण्यास अमेरिकेच्या नौका अथवा विमान वाहतुकीला पूर्ण मोकळीक असल्याचेही अमेरिकेच्या नौदलाने ठासून सांगितले आहे.