मंचर (पुणे) – भावडी (ता. आंबेगाव) येथील एका हॉटेलमधील दोन खोल्यांमधील स्वच्छतागृहांमध्ये देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला असून, एकुण 1 लाख 69 हजार 910 रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल आणि 4 हजार रुपयांच्या दोन वॉकीटॉकी असा एकूण 1 लाख 73 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. वॉकीटॉकीच्या सहाय्याने दारूविक्री केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.9) रात्री छापा टाकून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्याकडील पथक पेट्रोलिंक करीत होते. या दरम्यान पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना माहिती मिळाली की भावडी येथील हॉटेल मनोरंजनमध्ये निलेश बबन काळे व संतोष बबन काळे (रा. भावडी) हे वॉकी-टॉकीचा वापर करून बेकायदेशीर दारूविक्री करत असून, हॉटेलमागील खोल्यांमध्ये दारूचा साठा केलेला आहे. काउंटरवरून मागील खोल्यांमध्ये वॉकीटाकीवर कॉल देऊन ग्राहकांच्या गरजेनुसार दारू मागवली जात असे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना देऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक व मंचर पोलीस यांनी पंचांसमक्ष हॉटेलवर छापा टाकला. यावेळी नीलेश काळे हा मागील दरवाजाने पळून गेला. हॉटेलची झडती घेतली असता काउंटरजवळ देशी-विदेशी दारू व एक वाकी टॉकी असा माल सापडला.
दुसऱ्या वॉकीटॉकीबद्दल मिळालेल्या माहितीनुसार मागील खोलीमध्ये जाऊन तिथे असलेल्या नीता नीलेश काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील वॉकीटॉकी पोलिसांना दिली. पंचांसमक्ष खोलीच्या दरवाजांची कुलपे तोडून पाहणी केली असता दोन्ही खोल्यांच्या स्वच्छतागृहांमध्ये देशी-विदेशी दारूचा माल सापडला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, शंकर जम, शरद बांबळे, दीपक साबळे, अजित मडके, विनोद गायकवाड, शिवाजी चितारे, एस. व्ही. गवारी यांनी भाग घेतला.