पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी आता प्रतीक्षा यादीतील मुलांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे.
राज्यात 9 हजार 331 शाळांनी “आरटीई’ प्रवेशासाठी नोंदणी केली. याद्वारे 1 लाख 15 हजार 476 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 मुलांचे अर्ज आले.
यातील 1 लाख 920 मुलांना लॉटरी लागली. पहिल्या टप्प्यात लॉटरी लागलेल्या मुलांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. आतापर्यंत 68 हजार 221 मुलांचे प्रवेश निश्चित झाले.
प्रतीक्षा यादीत 75 हजार 465 मुलांचा समावेश आहे. रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जात आहे. परंतु फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये. “आरटीई’ पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये, तसेच प्रवेशासाठी मुलांना सोबत घेऊन जाऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.