अत्यावश्यकच्या नावाखाली अनावश्यक कामे; सर्वच विभागांचा पुढाकार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या करोनाने हाहाकार उडविला असला तरी महापालिका प्रशासनाने मात्र शेकडो कोटींच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करत कामांचा धडाका चालविला आहे. आरोग्य, वैद्यकीय विभाग वगळता इतर विभागांनी तब्बल 174 निविदा प्रसिद्ध केल्या असून, अत्यावश्यकच्या नावाखाली अनेक अनावश्यक कामेही यामध्ये रेटून नेण्याचा प्रकार चालविल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या करोना रुग्ण वाढत आहेत. कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त चौदाशे रुग्ण शहरात रोज आढळून येत आहेत. करोना संक्रमणामुळे राज्य शासनाने अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या रकमेच्या 33 टक्केच रक्कम खर्च करावी, असे आदेश दिले होते. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने 1682 कोटींच्या कामांना अत्यावश्यक असल्याचे भासवित शासनाकडून विशेष मान्यता घेतली आहे. यामध्ये 71 कामांचा समावेश आहे. मात्र, या कामांना मंजुरी मिळल्यानंतर जणू काही सर्वच्या सर्व कामांनाच मंजुरी शासनाने दिल्याचे भासवित अनेक निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
शासनाकडून मंजुरी घेताना पाणीपुरवठा, विद्युत, मलनिस्सारण विभागासह इतर काही विभागांसाठी विशेष मंजुरी घेण्यात आली होती. ठराविक कामांना मंजुरी असतानाही स्थापत्य, उद्यान, सुरक्षा, बीआरटीएस, विद्युतसह इतर अनेक विभागांनी राज्य शासनाच्या ई-टेंडर या वेबसाइटवर निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये रस्त्यांवर पट्टे मारणे, पेव्हिंग ब्लॉक नवीन बसविणे, दुरुस्त करणे, पदपथविषयक कामे, मनपाच्या इमारतींची दुरुस्ती करणे, बोर्ड- बेंचेस पुरविणे, चेंबर, स्ट्रॉमवॉटर, सीसीटीव्ही मेंटनन्स, दुरुस्ती, देखभाल, दूरध्वनी बसविणे, ध्वनिक्षेपक बसविणे- दुरुस्त करणे अशा प्रकारच्या अनेक निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या निविदांना राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे का? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे.
एका बाजूला करोनाचे संकट संपलेले नाही, शासनाकडून येणारे अनुदान घटले आहे तर महापालिकेच्या महसुलामध्येही मोठी घट झालेली असताना शेकडो कोटींच्या खर्चाची कामे इतक्या घाईने का काढली जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा अद्यापही लागू असताना आयुक्त या प्रकारावर नियंत्रण का ठेवत नाहीत की त्यांच्याच आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
41 कोटींची सुरक्षा विभागाची कामे
सुरक्षा विभागाने शासनाच्या ई-टेंडर या वेबसाइटवर पाच निविदा प्रकाशित केल्या आहेत. यामध्ये 9 कोटींच्या कामांच्या चार निविदा तर पाच कोटींच्या कामाची एक निविदा प्रकाशित केली आहे. यामध्ये ट्रॅफिक वॉर्डन पुरविणे, महापालिकेच्या मिळकतींची सुरक्षा करणाऱ्या रखवालदारांना 1268 मदतनीस पुरविणे यांचा समावेश आहे. ही निविदा यापूर्वी एकत्रित प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र काही ठराविक ठेकेदारांना सहभागी करून घेण्यासाठी आता निविदा विभागून प्रसिद्ध करण्यात आली आहे.