जामखेड (प्रतिनिधी) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करुन वाघिरे आणि साबळे कंपनीने बिडी उत्पादन सुरू केले आहे. महापुरुषाचे नाव बिडी उत्पादनास देऊन तमाम शिवप्रेमींच्या भावना कंपनीने दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही कंपनीचा निषेध करीत आहोत, असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या जामखेड तालुका शाखेच्यावतीने तहसीलदार विशाल नाईकवडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले म्हणाले, कंपनीने हे नाव बदलावे, यासाठी चार दिवसांपासून किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी शिवप्रेमींनी आंदोलन सुरू केलेले आहे. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेलेली नाही. इतर विषयांना महत्त्व देवून राज्य सरकार तमाम शिवप्रेमींची फसवणूक करत आहे. त्यामुळे युगपुरुणांच्या नावाने बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करावी.
जर शासनाने याची गांभीर्याने न घेतल्यास आम्ही शिवभक्त तीव्र आंदोलन करू, असा इशारा ही त्यांनी दिला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी आदित्य राजगुरू, जग्गू म्हेत्रे, गणेश जोशी, सागर नेटके, सागर गायकवाड, सचिन देशमुख, रमेश वाटाडे, गणेश थोरे, नाना खंडागळे, घनश्याम राळेभात, महादेव राऊत उपस्थित होते.