करोनाबाधितांची संख्या वाढली; दिवसभरात 1700 रुग्ण
पुणे – शहरात बाधितांची संख्या कमी होत असतानाच आज जवळपास 1700 रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शहरात वाढलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा यामुळे बाधित वाढू लागले आहेत. अशीच स्थिती राहिली तर शहर पुन्हा “हॉट स्पॉट’ ठरू शकते. गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 669 बाधित सापडले असून, 1 हजार 386 बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर, 33 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
जुलै महिन्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर शहरातील बाधित संख्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली होती . दि. 2 ऑगस्टला 1 हजार 762 बाधित सापडले. त्यानंतर बाधितांची संख्या उरत्या क्रमाने सुरू झाली. ती तब्बल 750 पर्यंत खाली आली होती. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या 18 दिवसांत केवळ दि. 12 आणि 16 ऑगस्टला बाधित संख्या दीड हजारापर्यंत पोहोचली. मात्र, अन्य दिवस बाधित संख्या 1 हजारच्या आसपास होती. परंतु, मागील आठ दिवसांपासून सण-उत्सवाच्या नावाखाली नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करू लागले आहेत.
करोना शहरातून गेला अशाच मानसिकतेमध्ये लोक बाहेर फिरत आहेत. गुरुवारी (दि.20) दिवसभरात 6 हजार 747 संशयितांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 3 लाख 83 हजार 828 जणांच्या तपासणीत करण्यात आली आहे.