मुंबई – येस बॅंक घोटाळ्यात मनी लॉंडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले मुख्य आरोपी कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांना आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) वाधवान बंधूविरोधात हायकोर्टात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यास एक दिवसाची दिरंगाई केल्याने त्याचा फायदा वाधवान बंधूना मिळाला.
हायकोर्टाने तांत्रिक कारणाच्या आधारे त्यांना जामीन मंजुर केला आहे. तब्बल 3 महिन्यांनंतर वाधवान बंधूंना किंचिंतसा दिलासा मिळाला तरीही त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.
वाधवान बंधूंविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी हायकोर्टाने ईडीला 60 दिवसांची मुदत दिली होती. ईडीकडून 13 जुलै रोजी आरोप पत्र कोर्टात दाखल केले. मात्र 60 दिवसांची मुदत 12 जुलै रोजी पूर्ण झाली असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव वाधवान बंधूना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. मात्र वाधवान बंधूसाठी सीबीआयच्या अन्य एका प्रकरणात तुरुंगातच रहावे लागणार आहे.
येस बॅंकेच्या 3700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. दिवाण हौसिंग फायनान्सने येस बॅंकेचे 750 कोटींचे कर्ज बुडवले आहे. हे कर्ज मंजूर करताना बॅंकेवर राणा कपूर यांचे नियंत्रण होते. त्यामुळे राणा कपूर यांनी देखील यातून फायदा मिळवला आहे, असे तपासात आढळून आले आहे.