ओतूर -श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वराची श्रावणी यात्रा यावर्षी करोनाच्याच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील अनेक गावे करोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट व बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत. यामुळे ओतूर येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवार यात्रा रद्द करण्यात आली आहे.
तर प्रतिवर्षी कपर्दिकेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगावर कलात्मक तांदळाच्या पिंडी तयार होत असतात पिंडीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात तसेच श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेतर्फे पहिल्या विद्यार्थ्यांच्या दिंडी स्पर्धा, दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त संगीत भजन स्पर्धा तिसऱ्या व चौथ्या श्रावणी सोमवारी कुस्त्यांचा जंगी आखाडा व मंगळवारी शिळ्या आखाड्याचे आयोजन करण्यात येते.
रूढी परंपरेनुसार मंदिरामध्ये शिवलिंगावर तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येणार आहेत. धार्मिक विधी करण्यात येणार असले तरी मंदिर मात्र भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार नाही. मंदिर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी भाविकांनी करू नये, असे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
राज्य शासनाचे आदेशानुसार कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ओतूर येथील श्रावणी यात्रा रद्द करण्यात आली आहे. जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आल्यामुळे नागरिक व भाविक भक्तांनी मंदिर स्थळावर गर्दी करून नियम मोडल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
– परशुराम कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक, ओतूर