वॉशिंग्टन: अमेरिका अणि चीन यांच्यातील एकमेकांवरच्या राजनैतिक कुरघोड्या सुरूच असून अमेरिकेने आज त्यांच्या देशात राहणाऱ्या चार चिनी नागरिकांवर व्हिसा फ्रॉड केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे.
हे चार जण चीनच्या लष्करासाठी काम करीत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे, पण या नागरिकांनी त्यांची खरी ओळख लपवून ठेवली होती त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या चार पैकी तीन नागरिकांना एफबीआयने अटक केली असून चौथा एक जण फरारी आहे. त्यांच्यावर व्हिसासाठी खोटी माहिती देऊन फ्रॉड केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून तो सिद्ध झाला तर या आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
अमेरिकेत राहात असलेल्या सर्वच चीनी नागरिकांची आता एफबीआयने तपासणी सुरू केली असून संशयितांना एफबीआय मुख्यालयात मुलाखतीसाठी बोलावून घेण्यात येत आहे.
चीनच्या लष्कराचीच माणसे खोटी कारणे दाखवून अमेरिकेत घुसवण्यात आली असल्याचे षडयंत्र आता उघडकीला आले आहे. त्यावरून आता चीन काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.