गोंदवले -जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच माण तालुक्यातही करोनाबाधितांचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. माण तालुक्यातील 34 गावांमध्ये आजअखेर 97 जणांना करोनाची बाधा झाली आहे तर भालवडी, लोधवडे, म्हसवड, खडकी पाटोळे, पळसावडे या गावांमधील प्रत्येकी एकाच असे एकूण पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने दिवसेंदिवस चिंतेत भर पडत आहे.
शासनाने अनलॉक धोरण जाहिर केल्यानंतर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येणे अपेक्षित होते. मात्र करोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुुन्हा दहा दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर माण तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. मंगळवारअखेर तालुक्यातील 34 गावांमध्ये 97 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील दोन रुग्णांचा मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला असून तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यात करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्याही मोठी असून आतापर्यंत तालुक्यातील 70 जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या 22 करोनाबाधित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
तालुक्यातील जवळपास एक तृतीयांश गावात करोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये दहिवडी, म्हसवड, गोंदवले बु, खडकी पाटोळे ही गावे करोना हॉटस्पॉट बनली आहेत. ग्रामीण भागातील करोनाचा शिरकाव वाढत चालला असून गेल्या 15 दिवसात माणमधील करोना बाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. सध्या बाहेरून आलेल्या व्यक्तींपेक्षा निकट संपर्कातील रुग्णसंख्या वाढत आहे.
तालुक्यातील बाधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर गेल्याने माणवासीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान करोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून लहान मुले, दुर्धर आजारांच्या व्यक्ती, गरोदर महिलांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे.
दहिवडी – 14, म्हसवड – 12 , खडकी पाटोळे – 9, गोंदवले बु. – 9, दोरगेवाडी – 5, वडजल – 4, राजवडी – 4, वरकुटे-मलवडी – 4, लोधवडे – 3, पिंपरी – 3, भालवडी -2, शिरताव – 2, मार्डी – 2, नरवणे – 2, इंजबाव – 2 विरळी – 1 परतवडी – 1, तोंडले – 1 दिवड – 1, राणंद – 1, गोंदवले खुर्द – 1, खोकडे – 1, वारुगड – 1, काळेवाडी – 2, खंड्याचीवाडी – 1, कुळकजाई – 1, पळसावडे – 1, वावरहिरे – 1, दानवलेवाडी – 1, पळशी – 1, मोगराळे – 1, कारंडेवाडी – 1 बिदाल – 1, आंधळी -1