कराड – करोना बाधितांची तात्काळ तपासणी होण्यासाठी राज्य शासनाकडून अँटीजेन कीट उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे फक्त पंधरा मिनिटात तपासणी करणे आता शक्य झाले आहे. कराड तालुक्यातील येळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या फास्ट कीटचा उपयोग करून 35 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात 3 जण करोना बाधित आढळून आले. दरम्यान, तालुक्यासाठी 125 अँटीजेन फास्ट कीट उपलब्ध झाले असल्याची माहिती, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी दिली.
संपूर्ण सातारा जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. संशयित रूग्णांचे अहवाल येण्यासाठी तीन दिवसांचा अवधी लागत आहे. अगदी कमी वेळेत करोना बाधिताचा अहवाल मिळावा यासाठी राज्य शासनाने सातारा जिल्ह्यास 1500 अँटीजेन फास्ट कीट उपलब्ध करून दिले आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त करोना बाधित हे कराड तालुक्यात आहेत. तालुक्यातील बाधितांचा आकडा 500 हून अधिक गेला आहे. अनेक गावे करोनाची हॉटस्पॉट ठरत असून तेथील साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत.
अँटीजेन फास्ट कीटमुळे अगदी कमी कालावधीत अहवाल उपलब्ध होणार असल्याने प्रशासनाचे काम सोपे होणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये या कीटचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या तात्काळ मिळून ती साखळी तोडण्यात यश येणार असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले. बुधवारी या कीटचा वापर करून येळगाव येथील 35 संशयित नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात तीनजण करोना बाधित आढळून आले असून त्यांच्यावर कराड येथे उपचार करण्यात येणार आहेत.
संक्रमणाचा विचार करता कीट अपुरे…
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक करोना बाधितांची संख्या कराड तालुक्यात आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यातील बाधितांचा तात्काळ अहवाल येण्यासाठी 125 अँटीजेन कीट पुरविण्यात आले असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. वास्तविक तालुक्यातील करोना बाधिताची परिस्थिती पाहता 125 अँटीजेन फास्ट कीट पुरेसे आहेत का अशी चर्चा होत आहे.