- एकाच दिवशी 715 रुग्णांची भर
- लॉकडाऊनच्या काळात 2268 नवीन रुग्ण
- शुक्रवारी सहा रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मंगळवारपासून शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या काळात शहरात 2268 इतकी विक्रमी रुग्णसंख्या वाढली आहे. तर आज करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आणखी एक उच्चांक गाठत 715 रुग्णांची उच्चांकी वाढ झाली आहे.
तसेच शुक्रवारी सहा रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या शहरातील 162 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 49 इतकी झाली आहे. गेल्या चार महिन्यांच्या काळात करोनामुळे शहरात 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या 9790 इतकी झाली आहे. आज शहरात नवीन 715 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 686 तर शहराबाहेरील 29 रुग्णांचा समावेश आहे. आज विक्रमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे.
तसेच दिवसभरात शहरातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भोसरी, थेरगाव, चिंचवड, नेहरुनगर, पिंपरी येथील पाच पुरुष रुग्णांचा समावेश आहे. तर रहाटणी येथील एका महिलेचाही यामध्ये मृत्यू झाला. करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र शहरातील रुग्णसंख्या दररोज नवीन उच्चांक गाठत आहे.
मंगळवारपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यापूर्वी दोन दिवस शहरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खरेदीसाठी बाजारपेठ, दुकाने, भाजीबाजार व इतर ठिकाणी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठवत खऱेदी केली. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर झाला आहे.
शहरात सद्यस्थितीत 3388 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान आज दिवसभरात 1380 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 1396 रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तसेच दिवसभरात 341 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 5900 इतकी झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये वाढलेली रुग्णसंख्या
14 जुलै 557
15 जुलै 449
16 जुलै 547
17 जुलै 715