पिंपरी – संपूर्ण जगाला कोविड-19 ने आपल्या कवेत घेतले असताना, कामगारनगरीतील चिंचवड स्टेशन येथील ईएसआय कॉर्पोरेट कार्यालयात मात्र अंदाधुंदी कारभार सुरु आहे. याचा फटका ईएसआयच्या लाभार्थी कामगारांना बसत आहे. योग्य महिती व मार्गदर्शन न करणे, उद्धटपणे बोलणे अशा अनेक अडचणींना कामगारांना सामोरे जावे लागत आहे. कामगारांसाठी ईएसआयसी आहे की ईएसआयसाठी कामगार आहेत? असा प्रश्न कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.
कामगारनगरीतील हजारो कामगारांना राज्य विमा कर्मचारी योजनेअंतर्गत येतात. दर महिन्याला कामगारांच्या मासिक वेतनातून राज्य विमा कर्मचारी योजनेसाठी ठराविक रक्कम कपात केली जाते. औद्योगिकनगरीतील हजारो कामगारांच्या लाखो कुटुंबातील सदस्यांना आजारपणात या योजनेचा मोठा आधार असतो. लॉकडाऊनमुळे कामगारनगरीतील बहुतांशी कामगारांचे स्थलांतर झाले आहे. तर मोहननगर येथील राज्य विमा कर्मचारी रुग्णालयात कोविड समर्पित रुग्णालय सुरु केल्याने, करोनाबाधितांव्यतिरिक्त अन्य रुग्ण कामगारांना उपचारांकरिता चिंचवड स्टेशन येथील कॉर्पोरेट कार्यालयात पाठविले जाते. याठिकाणी रुग्ण तपासणीची सुविधादेखील उपलब्ध आहे.
कोविड-19च्या काळात याठिकाणी येणाऱ्या कामगारांच्या पदरी मात्र निराशा पडत आहे. कोणतीही शंका अथवा माहिती विचारल्यास तर तुम्ही सरळ बिबवेवाडी कार्यालयात जा, असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले जाते, अथवा तुम्ही या कार्यालयात ज्या डॉक्टरांशी चर्चा केली आहे, त्यांनाच भेटा. मात्र, त्यांचा संपर्क क्रमांक मागितला असता, तो आमच्याकडे नाही, अशी दुरुत्तरे दिली जातात. आता एखादी शुल्लक माहिती विचारण्यासाठी लॉकडाउनच्या काळात प्रवासबंदी असताना बिबवेवाडी कार्यालयापर्यंत कसा प्रवास करावा? असा प्रश्न कामगारांना पडत आहे.
स्वत:चे नाव माहीत नसलेले कर्मचारी कार्यरत
या कार्यालयातील तळमजल्यावरील बहुतांशी कर्मचाऱ्यांना आपली स्वत:ची नावे माहीत नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये बसलेले अन्य डॉक्टर रुग्णांना समाधानकारक माहिती देऊ शकत नाहीत. तर या कार्यालयात कोणाशी चर्चा केली, याची माहिती बिबवेवाडी कार्यालयात द्यावयाची झाल्यास, कक्ष क्रमांक दोनमधील औषधनिर्माता तर घाबरुन स्वत:चे नावदेखील सांगायला तयार नसल्याचा अनुभव कामगार व त्यांच्या कुटुंबियांना येत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.