पुणे – सोनोरी (ता. पुरंदर) गावाची करोनाच्या हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करीत असून रविवारी (दि. 12) आणखी चौघे बाधित आढळले आहेत. त्यामुळे गावातील बाधितांची संख्या 14 झाली आहे. गाव 10 दिवसांसाठी बंद करण्यात आले असून दिवे-सोनोरी, वनपुरी-सोनारी हे रस्ते बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
सासवड-सोनोरी या रस्त्यावर चेक पोस्ट ठेवण्यात येऊन या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या यांच्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे, अशी माहिती माजी सरपंच सतीश शिंदे यांनी दिली. दरम्यान, गावात दोन दिवसाआड औषध फवारणी केली जात असून आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप गावात केले आहे.
जे संशयित रुग्ण आहेत त्यांना सी व्हिटॅमिन गोळ्या देण्यात आले आहेत. तसेच मास्क न वापरता गावात फिरणाऱ्या लोकांवर 500 रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. तर जे लोक क्वारंटाइन आहेत त्यांनी घराबाहेर कोणत्याही परिस्थितीत पडायचे नाही असा ठराव सरपंच कविता काळे, उपसरपंच नितीन काळे व सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला आहे. तर लोकांनी घरातच राहावे, सुरक्षित रहावे व शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामसेविका ज्योती काळभोर यांनी केले आहे.