नांदूर -दौंड तालुका हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आहे. यात गावगाड्यात सार्वजनिक शांतता व कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटलांवर भार असतो. नांदूर आणि बोराटे वस्तीची धुरा दोन पोलीस पाटील नियोजनबद्ध सांभाळत आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि प्रशासनात समन्वय साधून दोन्हीमध्ये खऱ्या अर्थाने दुवा बनले आहेत. बोराटे वस्ती येथील पोलीस पाटील नेहा बोराटे व नांदूर येथील धोंडीबा थोरात हे चोख भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कामांची दखल प्रशासनातील अधिकारी आर्वजून घेत आहेत.
गावांमध्ये पोलीस पाटलांकडे कायद्याचा प्रथम पालक म्हणून पाहिले जाते. हे काम करताना त्यांना अनेक अडचणी येतात. त्यातच करोनाच्या महामारीने दौंड तालुक्यात पाय रोवले आहे. लोकांमध्ये जनजागृती, बाहेरून आलेल्यांचा सर्व्हे, महसूल व पोलीस प्रशासनाला रिपोर्टिंग आदी कामे करीत आहेत.
आपत्कालीन कमिटीमध्ये दोन्ही पोलीस पाटील चोवीस तास काम करीत आहेत. नांदूर गावाला दोन महसूल सजा आहेत. बोराटे वस्ती येथे पोलीस पाटील म्हणून नेहा प्रवीण बोराटे काम पाहत आहेत. नांदूरसाठी पोलीस पाटील म्हणून धोंडीबा थोरात हे काम पाहत आहेत.
दोन्ही पोलीस पाटील हे चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. करोनासारख्या संकटात गावातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम करीत असल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. गावामध्ये औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परप्रांतीयांचे वास्तव्य आहे. त्यांना बस सेवा, रेल्वेची आसनव्यवस्था, रेशनिंग धान्य देणे, शासनापर्यंत माहिती पोहोचवणे, समन्वय साधत समस्यांचे निराकारण करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. ग्रामसुरक्षादलाच्या वतीने अनेक सामाजिक कार्य केले जात आहे. ग्रामसुरक्षादलच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.