हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीवादी प्रायमरीमध्ये 2 लाख जणांचे मतदान

हॉंगकॉंग: हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीवादी गटांनी घेतलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी प्रायमरी प्रायमरीमध्ये तब्बल दोन लाख जणांनी मतदान केले. हे मतदान हॉंगकॉंगमधील आगामी निवडणूकांसाठी उमेदवारांची निश्‍चिती करण्यासाठी आयोजित केले गेलेले होते.

या प्रायमरीचे आयोजन अनौपचरिकरितीने करण्यात आलेले होते. बीजिंगने दोन आठवड्यांपूर्वी हॉंगकॉंगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याच्या पार्श्‍वभुमीवर या प्रायमरीचे आयोजन लोकशाहीवादी गटांच्यावतीने करण्यात आले होते.

ब्रिटनकडून 1997 मध्ये हॉंगकॉंगचे हस्तांतरण चीनकडे एक देश- दोन व्यवस्था या चौकटीतून केले गेलेले होते. गेल्या वर्षी हॉंगकॉंगमध्ये झालेल्या व्यापक लोकशाहीवादी आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर ही चौकट बदलण्याच्या हेतूने चीनने हॉंगकॉंगमध्ये कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे पोलिसांना व्यापक अधिकार मिळणार आहेत.

अशाप्रकारे प्रायमरीचे आयोजन म्हणजे स्थानिक सरकार अस्थिर करणे आणि सरकारच्या कामात हस्तक्षेप करणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी या प्रायमरीमध्ये मतदान करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग ठरू शकतो, असा इशारा हॉंगकॉंगचे राज्यघटना व्यवहार मंत्री एरिक त्संग यांनी गेल्या आठवड्यात दिला होता.

मात्र तरिही मतदान केंद्रांबाहेर नागरिकांनी मोठ्या रांगा लावून आपला लोकशाहीवरील विश्‍वास व्यक्‍त केला. सरकारला निवडणूकीत बहुमत मिळवायचे असल्यानेच या प्रायमरीवर सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा दावा प्रायमरीच्या आयोजकांनी केला.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार आता पोलिसांना वॉरंटशिवाय शोध घेण्याचे व कायद्याचे उल्लंघन मानले जाणारे ई मेल काढून टाकण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स व प्लॅटफॉर्मना ऑर्डर देण्याचे अधिकार आहेत. शुक्रवारी पोलीसांनी प्रायमरीचे आयोजन करणाऱ्या पब्लिक ओपिनियन रिसर्च इन्स्टिट्युटवर छापा घातला. तेथील कॉम्प्युटर हॅक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला असून त्याबाबत तपास सुरू आहे.

या प्रायमरीतून लोकशाहीवादी गट आगामी निवडणुकीसाठी त्यांचे सर्वोत्तम उमेदवार निवडणार आहेत. हॉंगकॉंगमध्ये सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. चीनच्या बाजूने झुकलेल्या विधानसभेमध्ये शिरकव करणे हे या लोकशाहीवादी गटांचे उद्दिष्ट आहे.

या प्रायमरीच्या आयोजनासाठी लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून पैसे जमा केले होते. या प्रायमरीमध्ये 1 लाख 70 हजार जण भाग घेतील, अशी अपेक्षा असताना शनिवारीच 2 लाख 30 हजार नागरिकांनी या प्रायमरीमध्ये सहभाग घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.