पुणे – कोंढव्यात सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून खून करण्यात आला. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. तो खासगी सावकारीचा व्यवसाय करायचा. या घटनेने कोंढवा परिसरात खळबळ उडाली आहे. घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असे सराईताचे नाव आहे.
पडवळ खासगी वाहनचालक होता. यानंतर त्याने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला. एका गॅंगकडून त्याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न मध्यंतरी झाला होता. यामुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. दरम्यान, शनिवारी त्याच्या घरात अज्ञात व्यक्तींनी घुसून कोयत्याने वार करत त्याचा खून केला. माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पडवळचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पडवळ हा एकटाच या सदनिकेत राहात होता. त्याचे नातेवाईक फोनवरून त्याच्या संपर्कात असायचे. आज त्याने फोन न उचलल्याने नातेवाईक घरी दाखल झाले. दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही तो उघडला नाही. यामुळे नातेवाईकांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. तेव्हा पडवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. त्यांच्यावर 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत. मात्र, 2014 नंतर त्याच्यावर एकही गुन्हा नव्याने दाखल नव्हता.’
आठ वर्षांपूर्वी झाला होता गोळीबार
घनश्याम पडवळ हा पूर्वी शहराच्या मध्यभागात नाना पेठेत राहात होता. बेकायदा सावकारी करून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे कमवले होते. नाना पेठेतील एका सराईताशी असलेल्या वैमनस्यातून त्याच्यावर आठ वर्षांपूर्वी लष्कर परिसरात महात्मा गांधी रस्त्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर तो कोंढवा परिसरात राहायला गेला होता.