पुणे – शहरालगत ग्रामपंचायत हद्दीत करोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या भागातील छोट्या-मोठ्या हॉस्पिटल्समधील 80 टक्के बेड आरक्षित करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
हवेली तालुक्यातील बहुतांश भाग हा शहरी भागात येतो. आतापर्यंत हवेलीत सर्वाधिक 760 बाधित सापडले असून, जिल्हा परिषद प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. याबाबत संबंधित गटविकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपविली आहे. प्रसाद यांनी कोविडच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात 48 कोविड केअर सेंटर आहेत. यामध्ये प्रभावीपणे कार्यक्षम राहण्यासाठी केंद्रप्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्यही कम्युनिटी लिडर म्हणून कामकाज पाहणार आहेत. अधिक कोविड केअर सेंटर असतील तर पंचायत समिती सदस्यही कम्युनिटी लिडर म्हणून काम पाहणार आहेत.