आयसीसीच्या निर्णयापूर्वीच आशिया करंडक रद्द
पुणे :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने एक प्रकारे जागतिक क्रिकेटवर बीसीसीआयचे वर्चस्व मान्य केल्याचे बोलले जात आहे. ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणारच अशी आधी डरकाळी फोडलेल्या पाकिस्तानचे आता मांजर झाल्याचेच या निर्णयावरून स्पष्ट होत आहे.
बीसीसीआयने पाक मंडळाला आशिया करंडक रद्द करा तसेच पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने ऑगस्टपूर्वी खेळवा, अशी विनंती केली होती. त्यावेळी पाक मंडळाने बीसीसीआयच्या विनंतीला केराची टोपली दाखवत ही विनंती धुडकावली होती.
मात्र, गांगुलीने आयसीसीवर दबाब टाकत तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा तेव्हा घ्या, आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे खडेबोल सुनावले व संपूर्ण चित्रच बदलून गेले. आयसीसीचा निर्णय येण्यापूर्वीच पाक मंडळाने आशिया करंडक रद्द झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
अर्थात, श्रीलंका मंडळाला पाक मंडळाने आशिया करंडक स्पर्धा आयोजित करण्याची विनंती केली होती. मात्र, श्रीलंका मंडळाने ही विनंती फेटाळल्यामुळे पाक मंडळाला ही स्पर्धा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.
गांगुली बनला पॉवरहाउस
आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोण नियुक्त होणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार असले तरीही येत्या काळात बीसीसीआयच्या वर्चस्वाखालील जागतिक क्रिकेटचा नवा बॉस सौरव गांगुलीच ठरणार हे आता स्पष्ट दिसत आहे. गांगुली ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट हाताळत आहे ते पाहता तो जागतिक क्रिकेटचे पॉवरहाउस बनण्याच्या मार्गावर असल्याचेच दिसत आहे.