पिरंगुट -लवळे (ता. मुळशी) येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटलमध्ये मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील बाधित रुग्णांवरही मोफत उपचार होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सिम्बॉयोसिस हॉस्पिटलसोबत पाच कोटी रुपयांचा करार करणार असल्याची माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिली.
नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी सभापती महादेव कोंढरे, रविंद्र कंधारे उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील बाधित रूग्णांवरही मोफत उपचार होण्यासाठी जिल्हा परिषदेने तरतूद करावी अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर आयुष प्रसाद व रणजित शिवतरे यांनी सिम्बॉयोसिस हॉस्पिटल बरोबर पाच कोटी रूपयांचा करार करतो, असे आश्वासन दिले.