मंचर -अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील एका हॉटेल बाजूला झाडाखाली बेकायदा विक्रीसाठी आणलेला 3 हजार 338 रुपयांचा दारूसाठा मंचर पोलिसांनी मंगळवारी (दि. 7) रात्री छापा टाकून ताब्यात घेतला. दारू विकणारा पळून गेला असून, त्याचा शोध मंचर पोलीस घेत आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अवसरी परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना अवसरी येथील एका हॉटेलच्या बाजूला झाडाखाली एक व्यक्ती दारू विकत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे, पोलीस जवान एस.बी. गिलबिले, एस. वाय. चितारे, विलास साबळे या ठिकाणी गेले असता एक व्यक्ती बेकायदेशीर दारूची विक्री करताना दिसून आली. पोलीस आल्याची चाहूल लागताच ही व्यक्ती तेथून पळून गेली.
तेथील काही जणांना त्याचे नाव विचारले असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी बेकायदा दारू विकणाऱ्याचे नाव अंकुश जानु भोसले (वय 32, रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) असे सांगितले. देशी दारूच्या 19 बाटल्या आणि मॅकडॉल कंपनीच्या 16 बाटल्या असा एकूण 3 हजार 338 रुपयांचा माल मंचर पोलिसांनी तेथून ताब्यात घेतला आहे. याबाबत विलास साबळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.