नायपितॉ, (म्यानमार) – म्यानमारच्या उत्तरेकडील एक खाण कोसळल्याने झालेल्या अपघातात किमान 113 जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत मरण पावणाऱ्यांची संख्या याहूनही अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसामुळे खाणीचा काही भाग तलावामध्ये कोसळल्यामुळे तलावातील पाणी खाणीमध्ये घुसले. चिखल आणि पाण्याच्या लोंढ्यामध्ये खाणीतील कामगार जमिनीखालीच गाडले गेले आहेत.
म्यानमारमधील कचिन प्रांतात हप्कांत भागात मौल्यवान खड्यांची ही खाण आहे. दुर्घटना घडली, तेव्हा या खाणीमध्ये कामगार हे मौल्यवान खडे गोळा करण्यासाठी गेलेले होते. मुसळधार पावसामुळे भुसभुशीत झालेल्या जमिनीचा काही भाग खचला आणि जवळच्या तलावाचे पाणी खाणीमध्ये घुसले. मदत आणि बचाव पथकाने आतापर्यंत 113 मृतदेह खाणीतून बाहेर काढले आहेत. मात्र, अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. अनेकांचे मृतदेह खाणीतील चिखलामध्ये गाडले गेलेले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे बचाव पथकाच्या अधिकारी तार लिंग मॉंग यांनी सांगितले.
म्यानमारमधील हप्कांतमध्ये खाणउद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. तेथील खाणींमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांची वानवा आहे. त्यामुळे खाणीत होणाऱ्या दुर्घटना ही नित्याची बाब आहे. यापूर्वी 2015 मध्ये अशीच खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 100 जण ठार झाले होते. अलीकडच्या काळात खाणींमधील दुर्घटनांमध्ये शेकडोजण मरण पावले आहेत. मरण पावणाऱ्यांमध्ये मौल्यवान खडे निवडून गोळा करणाऱ्या हौशी रत्नपारखींचा समावेशही आहे. हे लोक या खड्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगांना या खड्यांची विक्री करतात.