वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास “एच 1-बी’ व्हिसावर घातलेली तात्पुरती स्थगिती उठवली जाईल, असे आश्वासन अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी दिले आहे. या व्हिसाच्या आधारे बहुतेक भारतीय अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान उद्योगातील कंपन्यांमध्ये नोकऱ्या करत आहेत. मात्र, ट्रम्प प्रशासनाने 23 जून रोजी “एच 1-बी’ व्हिसा स्थगित केला होता.
“एच 1-बी’ व्हिसाबरोबरच विदेशातील नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्य प्रकारच्या व्हिसालाही ट्रम्प यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत स्थगित केले आहे. अमेरिकेतील कठीण आर्थिक प्रसंगात स्थानिक नागरिकांच्या रोजगाराला बाधा येऊ नये, म्हणून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.
आशियाई अमेरिकन आणि पॅसिफिक आयलॅंडवरील डिजिटल टाऊन हॉल बैठकीत बिडेन यांनी “एच 1-बी’धारकांच्या योगदानाचे कौतुक केले. कंपनी व्हिसाच्या नागरिकांनी या देशाची उभारणी केली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यावर पहिल्या 100 दिवसांत करायच्या कामांमध्ये हे सर्वांत महत्त्वाचे काम असेल, असे ते म्हणाले.
देशाच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या आणि कागदपत्रे नसलेल्या 11 दशलक्ष नागरिकांना नागरिकत्व देण्याचे इमिग्रेशन सुधारणा विधेयक संसदेमध्ये आणले जाईल, असेही बिडेन यांनी म्हटले आहे. इमिग्रेशन व्यवस्थेमध्ये सुधारणा आणि आधुनिक व्यवस्था राबवणे, हे आपल्या प्रशासनाचे काम असेल, असेही बिडेन म्हणाले.
ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण अमानवी आणि क्रूर असल्याची टीकाही बिडेन यांनी केली. मोठी स्वप्ने बघणाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आपण त्वरित पावले उचलू. पूर्व आणि दक्षिण आशियातील अशा सुमारे 1 लाख महत्त्वाकांक्षी युवकांसाठी आपले प्रशासन अनुकूल धोरण राबवेल, असेही ते म्हणाले.