जळोची -दोन वेगवेगळ्या वाहनांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वाहनमालकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक हेमंतकुमार सोलनकर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, सोलनकर यांचे सहकारी प्रकाश मुळे यांना माहिती मिळाली की एमएच 42 एक्यू 0711 या बोगस क्रमांकाची गाडी फिरवली जात आहे.
या माहितीच्या एमआयडीसी येथील पियाजिओ कंपनीच्या परिसरात या वाहनाचा शोध घेतला असता येथे उभ्या असणाऱ्या एका ट्रकची नंबर प्लेट खोडल्याचे आढळून आले. यावेळी त्यांनी वाहनाच्या चासी क्रमांकाची तपासणी केली असता हेच ते बोगस वाहन असल्याची खात्री पटली.
दरम्यान, पियाजिओ कंपनीस पत्र देत या वाहनाची कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. या कागदपत्रांच्या माहितीवरून 30 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हे वाहन केरळला रवाना झाल्याचे तर याच क्रमांकाचे वाहन सकाळी दहाच्या सुमारास मटेरियल गेटमधून आल्याचे आढळले.
केरळवरून कोणतेही वाहन दोन दिवसांत डिलिव्हरी देऊन परत येऊ शकत नाही. त्यामुळे एकच क्रमांक लावून दोन वेगवेगळी वाहने वापरून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.