नागपूरची अंतरा मेहता बनली महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट!

नागपूर : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट सर्वांसमोर उभे आहे तर दुसरीकडे या संकटकाळात नागपूरमधून एक चांगली आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक अखेर मिळाली आहे. अंतरा मेहता असे त्यांचे नाव आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. शिवाय ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा मेहता आता लढाईच्या मैदानात जाण्यासाठी तयार आहेत. अंतरा मेहता यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


अंतरा मेहता यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झाले. तर अभियांत्रिकीचं शिक्षण रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एसएसबीची तयारी केली. मग त्यांनी हैदराबाद येथील डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. इथे त्यांनी ‘पिलेटस पीसी-7’, दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ‘किरण एमके-1’ हे लढाऊ विमान उडवले. मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह 123 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे ‘हॉक्स’ या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

देशातील दहा महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहता यांचा समावेश झाला आहे. नागपूर संरक्षणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “रवी आणि पूनम मेहता या दाम्पत्याची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता आता महाष्ट्राच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक बनल्या आहेत. आहे. फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा या आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.